सिल्लोड (प्रतिनिधी) : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (शिंदे गट) कडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या.
शिवसेना पदाधिकारी केशवराव पा. तायडे, विश्वास दाभाडे, नंदकिशोर सहारे, सुदर्शन अग्रवाल, श्रीराम महाजन, देविदास लोखंडे, दुर्गाबाई पवार यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला. सिल्लोड शहरातील शिवसेना भवन कार्यालयात दिवसभर हे मॅरेथॉन मुलाखत सत्र सुरू होते. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या मुलाखती दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहिल्या. एकूण २८ नगरसेवक पदांसाठी तब्बल १७२ पेक्षा अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्याने शिवसेनेतील उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. शहरातील प्रत्येक प्रभागातून इच्छुक उमेदवारांनी वाजतगाजत शक्तीप्रदर्शनाने शिवसेना भवनकडे आगमन करीत मुलाखती दिल्या,
उमेदवारांच्या मुलाखती निमित्त संपूर्ण शहर जय भवानी, जय शिवाजी, एकनाथराव शिंदे आमदार अब्दुल सत्तार यांच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते. शिवसेनेचे मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात सिल्लोड नगर परिषदेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढत असल्याचे केशवराव पा. तायडे म्हणाले. नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा प्रचंड उत्साह पहायला मिळाला,
आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने शहरात करण्यात आलेला व करणाऱ्या विकासावर ही निवडणूक एकतर्फी होवून शिवसेनेचे सर्वच उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास केशवराव तायडे यांनी व्यक्त केला. जवळपास १७२ इतक्या इच्छुक उमेदवारांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज केला. त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शिवसेना पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसह मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मुलाखती दरम्यान प्रत्येक उमेदवाराची प्रतिमा, सामाजिक कामातील सहभाग, प्रभागाची माहिती, मागील कामगिरीचा आढावा, स्थानिक जनसंपर्क, सामाजिक गणिते तसेच पक्षनिष्ठा या मुद्द्यांवर सखोल चर्चा करून माहीती घेण्यात आली. उमेदवारांची जनाधारक्षमता आणि कार्यकर्त्यांशी असलेले संबंध हे सुद्धा या मुलाखतीत महत्त्वाचे निकष मानले जात आहे. इच्छुक उमेदवार जास्त आहेत.
सर्वांचा सखोल अभ्यास विचार करून याबाबत आमदार अब्दुल सत्तार योग्य निर्णय घेतील. जो उमेदवार पक्षाकडून दिल्याजाईल त्या उमेदवारामागे सर्वांनी एक दिलाने खंबीरपणे उभे राहून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार अब्दुल सत्तार यांचे हात मजबूत करावे, असे आवाहन शिवसेना पदाधिकारी केशवराव तायडे, देविदास लोखंडे आदींनी केले.